
जयोस्तु ते जयोस्तु ते
जयोस्तु ते जयोस्तु ते श्रीमह्न्मंगले । शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥ धृ. ॥
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति सपंदांची ।
स्वतंत्रते भगवती । श्रीमती राज्ञी तू त्यांची ।
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी ।
स्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी ॥ १ ॥
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली ।
स्वतंत्रते भगवती । तूच जी विलसतसे लाली ।
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची ।
स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ॥ २ ॥
मोक्ष, मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रम्ह वदती ।
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें ।
स्वतंत्रते भगवती । सर्व तव सहचारी होते ॥ ३ ॥
हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते ।
तुजसाठिं मरण तें जनन ।
तुजविण जनन तें मरण ।
तुज सकल चराचर शरण ।
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे ।
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥ ४ ॥
हे हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला ।
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला ।
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला ।
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वा त्यजिला ॥ ५ ॥
स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला ।
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला ।
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां ।
कां तुवां ढकलुनी दिधली ।
पूर्वीची ममता सरली ।
परक्यांची दासी झाली ।
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे ।
स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे ॥ ६ ॥
- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
No comments:
Post a Comment