हिंदु नृसिंहा
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हे तूंते । वंदना
करि अंत:करण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदूर्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुध्दि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबड्या जीवां । लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
- स्वा. सावरकर
वरील गीताची सुंदर कथा १ मे २०१० रोजी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली. ती अशी
नाशिक येथे शिव जयंतिचा मोठा कार्यक्रम साजरा होणार होता आणि त्या कार्यक्रमाला टिळक उपस्थित राहणार होते. म्हणुन संयोजकांनी स्पर्धा ठेवली. १५ वर्षा खालील मुलापैकी जो कोणी शिवाजी राजांवर सुंदर कविता करेल त्याला टिळकांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल. ह्या कार्यक्रमाला विनायक दामोदर सावरकर भगूर हून पायी आले होते. भगूर ते नाशिक जवळ जवळ १५ ते २० मैलाचे अंतर आहे. त्यावेळी सावरकर फ़क्त ११ वर्षाचे होते. नाशिकला त्यांनी ह्या कार्यक्रमात वरील कविता म्हटली आणि त्यांना टिळकांच्या हस्ते पहिले पारितोषिक सुध्दा मिळाले. नंतर टिळकांनी त्यांना जवळ बोलावून विचारले, “ बाळ तुला पहिले पारितोषिक मिळाले आता खरं सांग हि कविता तुला कोणी लिहून दिली तुझ्या वडिलांनी की काकांनी.” त्यावर सावरकर म्हणाले, “ जर ज्ञानेश्वर महाराज १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहू शकतात तर मी ११ वर्षी साधी कविता नाही का लिहू शकत?” टिळक हसले आणि सावरकरांना आर्शीवाद देत म्हटले, “ बाळ तु खुप मोठा होशील.”
No comments:
Post a Comment