Tuesday, May 18, 2010

संत तुकारामाचे अभंग

सुख पाहतां जवापाडें । दु:ख पर्वताएवढें ॥ १ ॥

धरीं धरीं आठवण । मानीं संतांचे वचन ॥ २ ॥

नेलें रात्रीनें तें अर्ध । बाळपण जराव्याध ॥ ३ ॥

तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी मूढा ॥ ४ ॥

      संसारामध्यें सुख जवाप्रमाणें किंचित आहे आणि दु:ख मात्र पर्वताएवढें मोठें आहे १.
      एवढ्याकरितां संतांचे वचन तूं मान व त्याची नेहमीं आठवण ठेव, असें द्विरुक्तीनें सांगतात २.
      अरे, ह्या मृत्युलोकांत मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा शंभर वर्षे आहे. त्यामध्ये रात्रीचे बारा तास निद्रेंत जातात. म्हणजे शंभरांतील पन्नास गेलीं, बाकी राहिलीं पन्नास त्यांत बारा वर्षे बाळपणांत गेली. काही राहिलेली तारुण्याच्या मस्तींत गेलीं व काही रोगांत व बाकी राहिलेली शेवटचीं म्हातारपणात गेलीं ३.
      तुकाराम महाराज म्हणतात, अरे मूर्खा अशा रीतींने हा देह व्यर्थ जाऊन पुन्हां जन्ममृत्युरूपी घाण्याला तू जुंपला जाशील ४.
[६३]
॥ सार्थ श्रीतुकारामाची गाथा ॥

No comments: